आवाज कोकणचा / नवी मुंबई

हेमंत कोळी 



शिवडी-न्हावाशेवा पुलावर धावली चक्क रिक्षा

नवी मुंबई :* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. २१.८ किमी लांबीचा हा पूल फक्त सर्वात मोठाच नाही तर तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात लांब पूल आहे. शनिवारी या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर हौशी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पुलावर लोक सेल्फी घेण्यासाठी थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईकरांकडून नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



  यामुळे आता मुंबई पोलिसांनीही अशा बेजबाबदार नागरिक आणि वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अटल सेतूवर चक्क एक रिक्षा धावताना दिसली आहे. एक्सवर एका युजरने रिक्षा पुलावर धावत असल्याचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर नेटकरी रिक्षा पुलावर पोहोचलीच कशी? अशी विचारणा करत आश्चर्य व्यक्त करत आहेत. यावेळी अनेकांनी मुंबई पोलिसांना टॅग करत रिक्षा चालकावर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. 


   एका युजरने म्हटलं आहे की, "हा तिथपर्यंत पोहोचलाच कसा? दोन्ही बाजूला टोलनाके असतानाही रिक्षाला पुलावर जाण्याची परवानगी मिळाली कशी?". दरम्यान एका युजरने किमान तो फोटो काढण्यासाठी थांबला तर नाही अशी उपहासात्मक कमेंट केली आहे. तर एकाने ऑटो सेतू म्हटलं आहे. एका युजरने रिक्षाच्या मागे लिहिलेल्या पाटीवर लक्ष वेधत कमेंट केली आहे की, 'त्याने रिक्षाच्या मागे FIR Milenge लिहून आधीच इशारा दिला आहे'.

पुलावर कोणत्या वाहनांना परवानगी?

   या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात. मुंबई पोलिसांनी वेगमर्यादा ताशी १०० किमी ठरवली आहे. पूल चढताना आणि उतरताना ही मर्यादा ताशी ४० किमी असेल. पुलावरुन प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे. जर तुम्ही एकाच बाजूचा टोल भरत असाल तर २५० रुपये भरावे लागतील. पण रिटर्नचाही काढला तर ३७५ रुपये होतील. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी पासची सुविधाही आहे...! 

Comments

Popular posts from this blog