आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण / पुजा चव्हाण
उरणचे पत्रकार अनधिकृत बांधकाम , गोदाम यावर कारवाईसाठी उपोषणाच्या पावित्र्यात ...
१५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण
उरण तालुक्याच्या किनारी भागात मोठ्या प्रमणात धनदांडग्यांनी केलेले सी आर झेड कायद्याचे उल्लंघन, तालुक्यात तहसिल कार्यालयाकडील अधीकृत यादीनुसार व यादीत नसलेले अनधिकृत गोडावून , कंटेनर यार्डांचे पीक आणि उरण शहराला लागून बोरी - पाखाडीत वसलेल्या छोट्या वस्त्या उठविण्यात व सर्व गोदामांवर थेट बंदीची कारवाई करावी अशी मागणी असतानाही प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सततच्या अर्थपुर्ण ? दुर्लक्षापणामुळे उरणचे पत्रकारच आंदोलन करणार आहेत.
तालुक्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या तहसिलदारांना उरण तालुका मराठी पत्रकार संघाने यापुर्वीच
सर्वच विषयांवर अवगत केलेले असतांनाही संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उरणच्या पत्रकारांनी उपोषणास्त्र उगारले आहे.
त्या संबंधीचे लेखी पत्र उरण तहसिलदारांना देऊन या उपोषणाची उद्घोषणा केली आहे.
महसुल विभागाकडून केवळ जुजबी दंडात्मक कारवाया करून संबंधितांना पुन्हा बेकायदेशिर गोदामे चालविण्याचा जणू अलिखित परवानाच दिला जात आहे. या बेकायदेशीर गोदामे तसेच यार्डकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने या यार्ड व गोदामांशेजारील २८ रस्त्यांच्या मार्गांवर दोन लेनमध्ये अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात असल्याचे नेहमीच दिसून येत आहे. ज्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांनाही ही बेकायदा पार्कंग सातत्याने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.
काही गोदामांच्या परिसरात तर गावगुंडांकडून अवैधरित्या रस्त्यांवरच वाहनतळ तयार केले आहेत.
उरण तालुक्यात सी आर झेड कायद्याची देखील मोठ्या प्रमाणात पायमल्ली करण्यात आलेली आहे. विशेषता: केगाव दांडा समुद्र किनारा भागात तर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अनधिकृत भराव आणि बांधकामे करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये याबाबतच्या रकानेच्या रकाने भरून बातम्या देखील छापून आल्या आहेत मात्र त्यांनतर ही महसूल विभागाने या विषयावर कारवाईचा दांडू चालविलेला नाही त्यामुळे पत्रकार संघाच्या वतीने या विषयावर लेखी स्वरूपात तहसिल कार्यालयाला यापुर्वीच निवेदन दिले आहे. त्याला देखील एका महिन्याचा कालावधी व्हायला आला आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही हालचाल होतांना दिसत नसल्याने उरण तालुका मराठी पत्रकार संघ या आंदोलनावर ठाम आहे.
उरणच्या बोरी पाखाडी परिसरातील शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात. परप्रांतीय अनधिकृत भंगारवाल्यांनी कब्जा केला आहे. त्या ठिकाणी त्यांनी एका मदरशाचे देखील बेकायदा काम केले आहे. या ठिकाणी काही भाड्याच्या खोल्या निर्माण झाल्या असून त्यामध्ये कोणीही येऊन अवघ्या महिना पंधरा दिवस राहून जात आहेत. अशा लोकांकडून उरण तालुक्यात काही घातपाती कारवाया देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व अनधिकृत भंगारवाल्यांना या ठिकाणावरून हाकलून लावावे अशी देखील पत्रकार संघाची जुनीच मागणी आहे. त्यावरही तहसील कार्यालय आणि नगर परिषद कार्यालय यांच्या माध्यमातून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळेच या सर्व प्रश्नांवर आता जाहीर आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला दिसत नाही म्हणून उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी उरण तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार संघाने उरण तहसिलदारांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे
Comments
Post a Comment