आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि / उरण
उरण एन.एम.एम.टी बससेवा पूर्ववत चालू करण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांचे परिवहन व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना निवेदन...
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व खजिनदार शैलेश ठाकूर यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापकीय अधिकारी श्री. योगेश कडूसकर यांची बेलापूर येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली व गणपतीपूर्वी बस सेवा चालू करण्याबाबत आग्रहाची विनंती केली आहे.
नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत असतानाच जवाहरलाल नेहरू बंदर , उरण ते वशेनी पर्यंत नवी मुंबईचा विस्तार झाला आहे.
संपूर्ण विभागात झपाट्याटने औद्योगीकरण होत असल्यामुळे लोकसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे परिणामी वाहतूक व्यवस्थेवरचा भार वाढला आहे. बेलापूर व नेरूळ ते उरण अशी रेल्वे सेवा सुरू झाली आहे परंतु ती मर्यादित गावांना जोडत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांना त्याचा फायदा होत नाही परंतु वर्षानुवर्षे सुरू असलेली एन एम एम टी ची बस सेवा मात्र या सर्व गावांना जोडलेली असल्यामुळे ती जनतेच्या हितासाठी फायदेशीर ठरत होती .
नवी मुंबई आधुनिक शहर असून येथे अनेक शैक्षणिक संकुले उभी राहिली आहेत तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ची अनेक कार्यालय येथे आहेत. जागतिक दर्जाची बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्वच ठिकाणी जाण्या येण्याकरता विद्यार्थी, कामगार , महिला व कामानिमित्त बाहेर पडणारी जनता बहुसंख्येने नवी मुंबईकडे ये जा करत असतात
मध्यंतरी खोपटे येथे झालेल्या एका अपघातानंतर सदर विभागात येणाऱ्या सर्वच बस सेवा एन एम एम टी च्या कामगार संघटनांनी बंद पाडल्या आहेत याबाबत काल योगेश कडूसकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कामगार संघटनांसोबत चर्चा चालू असून लवकरच यावर तोडगा काढून उरण पर्यंतची बस सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. अशोक म्हात्रे यांना सांगीतले आहे.
Comments
Post a Comment