विषारी वायू मुळे उरण करंजा बंदरात बोटीवरील दोन खलाशांचा गुदमरून मृत्यू तर पाच खलाशी बेशुद्धावस्थेत
आवाज कोकणचा : नवी मुंबई
उरण वार्ताहर / पूजा चव्हाण
नवी मुंबई जवळील करंजा बंदरात मागील आठवड्यात दोन खलाशांचा बोटीवर निर्माण झालेल्या विषारी वायू मुळे गुदमरून जागीच मृत्यू झाला तर पाच खलाशी बेशुद्धावस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
हे प्रकरण वरिष्ठ पातळीवरून दडपण्याचा जोरदार प्रयत्न सुरु असून भोपाळ गॅस कांडाची पुनरावृत्ती या बंदरात झाल्याने साऱ्या परीसरासह मच्छीमार बांधवात घबराटी बरोबरच दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या बोटीवर मासे साठवण्याच्या शीतपेटी मधून निर्माण झालेल्या वायू मुळे मच्छी खवय्यांचे धाबे दणाणले आहेत, मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता हे संपूर्ण प्रकरण शासकीय यंत्रणा व या संबंधित सर्व विभाग कार्यालयाचे अधिकारी महात्मा गांधीजींच्या तीन माकडांप्रमाने हाताची घडी तोंडावर बोट व डोळे बंद आणि कानावर हात ठेऊन मुग गिळून बसले आहेत.
मुंबई येथील ससून डॉक या बंदरात मच्छीमार बोटींची वाढती संख्या व मुंबईतील वाढती रहदारी लक्षात घेऊन ब्रिटीशकाळा पासून कार्यरत असलेल्या या बंदराला पर्यायी बंदर असावे या करिता महाराष्ट्र शासनाने रायगड मधील उरण-करंजा येथील समुद्रकिनारी असणाऱ्या नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत याठिकाणी कोकण विभागांतील मच्छीमार बोटींसाठी आणि विशेषत: रायगड येथील मच्छीमार बोटीसाठी करोडो रुपये खर्च करून जेट्टी उभारली आहे.
असुविधांचे आगार असलेली या जेट्टीचा मात्र येथील स्थानिक कोळी समाज व मच्छीमार बांधवांच्या मतांवर डोळा ठेऊन अत्यंत घाईगडबडीत उद्घाटन सोहळा सपन्न करण्यात सरकारने धन्यता मानली होती.
शुक्रवार दिनांक 8/11/2024 रोजी उरण करंजा बापदेव पाडा येथील रहिवासी गोरख नामदेव नाखवा यांच्या मालकीची मल्हारसाईराज नावाची MH-7-MM-816 क्रमांकाची ही मच्छीमार नौका करंजा बंदरात सकाळी दाखल झाली होती. या नौकेवर समुद्रात पकडण्यात आलेले मासे साठविण्यासाठी शीतपेटया तयार करण्यात आल्या आहेत . सर्व साधारणपणे एक शीतपेटी ही दोन टन क्षमतेची आहे , या मध्ये बर्फ टाकून मासे साठवून ठेवण्यात आले होते, सायंकाळी बाजाराची वेळ होताच नौकेमध्ये पकडण्यात आलेले मासे विक्रीसाठी बाहेर काढणे आवश्यक असल्याने दुपारच्या सुमारास ओम प्रकाश गौतम वय वर्षे 28, शिवकुमार राम सवारे, वय वर्ष 29 राहणार मजखंबा खुर्द ता.तुलसीपूर, जिल्हा बलरामपुर,उत्तरप्रदेश हे दोघे या शीतपेटी मधून मासे काढण्यासाठी शित पेटीमध्ये उतरले असता मासे कुजले असल्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रीये मुळे शीतपेटीत निर्माण झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात दोन्ही खलाशी येताच त्यांना श्वास घेणे कठीण झाले व ते जागीच कोसळले , बराच वेळ आपले साथीदार बाहेर येत नसल्याचे पाहून नौकेवरील अन्य पाच खलाशी त्यांना शोधण्यासाठी या शीत पेटीत गेले असता ते सुद्धा या विषारी वायुच्या संपर्कात आल्याने जागीच बेशुद्ध पडले.
सदर घटनेची माहिती नाखवा व आजूबाजूच्या खलाशांना मिळताच मोठया प्रयासाने सर्वांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आल्यावर सर्वाना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ओम प्रकाश गौतम वय वर्षे 28, व शिवकुमार राम सवारे वय वर्ष 29 हे मृत झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले तर राजेंद्र परशुराम पाटील वय वर्ष 41, रा.रायगड-पेण (वरठा), मयूर चिमण वरठा वय वर्ष 28 रा.पालघर-डहाणू , रामचंद्र बाबू पाटील वय वर्ष 42 रायगड-पेण (व्हरडी), आकाश काशिनाथ पाटील वय वर्ष 23 पालघर (धानाई), हे अत्यवस्थ अवस्थेत आहेत. बोटीचा तांडेल सोमदत्त विठोबा पाटील पेण व मालक गोरख नामदेव नाखवा , करंजा बापदेव पाडा यांनी या घटनेची नोंद पोलीस ठाणे उरण येथे दिली असून अपमृत्यू नोंद क्रमाक 92/2024भा.ना.सु.स कलम 194 अन्वये करण्यात आली असून सदरची फिर्याद गोरख नामदेव नाखवा यांनी दिली असून घटना समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मिसाळ, पो.नी.शरद जाधव (प्रशासन), सहा.पोलीस निरीक्षक नितीन खाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली . या घटनेचा अधिक तपास उरण पोलीस करीत आहेंत.
Comments
Post a Comment