आवाज कोकणचा / नवी मुंबई
शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थिनीला 'वर्गबंदी'....
अशोक म्हात्रे ( नवी मुंबई )
पालकांमध्ये संतापाचे वातावरण...
विद्यार्थिनीच्या शालेय शुल्क थकबाकीचे कारण देत दहिसरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १० वर्षांच्या विद्यार्थिनीला नियमित वर्गात बसू न देता वाचनालयात वेगळे बसवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थिनीला इतर मुलांपासून दूर ठेवत 'शिक्षा' देण्यात येत असल्याने तिच्यावर मानसिक ताण निर्माण झाला आहे. शाळेच्या या भूमिकेविरोधात पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी पहिल्या सत्राचे शुल्क भरले होते. मात्र, दुसऱ्या सत्राचे शुल्क भरण्यासाठी काही आर्थिक अडचणींमुळे विलंब लागणार असल्याचे त्यांनी 'पालक-शिक्षक सभेत' संबंधित शिक्षक व शाळा प्रशासनाला कळवले होते व त्यासाठी मुदत मागितली होती.
विशेष म्हणजे, या विद्यार्थिनीला सातत्याने काही दिवस वर्गाऐवजी वाचनालयात बसवण्यात आले.
परिणामी, नियमित अध्यापनापासून ती वंचित राहिली असून, अभ्यासात मागे पडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
इतर विद्यार्थ्यांसमोर वेगळे बसवण्याच्या या प्रकारामुळे मुलीच्या मनोबलावर परिणाम झाला असून, आता ती शाळेत जायला घाबरत असल्याचे पालकांनी म्हटले आहे.
या घटनेची माहिती स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी पालकांनी दर्शवली आहे. ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशनचे रोहित दंडवते यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवत या अन्यायाविरोधात दाद मागितली आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने शाळांनी संवेदनशीलतेने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत मुख्याध्यापिका दिप्ती वाघेला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या सर्व प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकला नाही.
आर्थिक अडचणी तात्पुरत्या असू शकतात; मात्र शिक्षण हा मूलभूत हक्क असून कोणत्याही कारणास्तव विद्याथ्यांला वर्गाबाहेर ठेवता येत नाही. असे शिक्षण हक्क कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे शाळेची कारवाई नियमबाह्य असून शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा', अशी मागणी
पालकांनी केली आहे.



Comments
Post a Comment