आवाज कोकणचा / नवी मुंबई
उलवे शगुन चौक परिसरात पोलीस पथकावर हल्ला, ८ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
उलवे / पूजा चव्हाण
उलवे, 1 फेब्रुवारी 2026:
उलवे शगुन चौक परिसरात गत रात्री ११.५५ वा. ते ००.१५ वा. दरम्यान पोलीस पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ पोलीस जखमी झाले आहेत. आरोपींच्या विरुद्ध उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे इस्माईल शेख, शाहीद खान व त्याचे साथीदार आयाज खान, आसिफ खान, मेराज खान, निजाम, शोएब, मेहराज (पूर्ण नाव पत्ते माहित नाहीत) यांनी आपसात संगनमत करुन, बेकायदेशीर जमाव जमवून हातामध्ये हॉकी स्टीक, तलवार, चॉपर, गावठी कट्टे घेवून तपासकामी आलेल्या पोलीस पथकाचे शासकीय कामात अडथळा निर्माण करुन त्यांचेवर हल्ला केला.
हल्ल्यात पोलीस मित्र अतुल जयस्वाल, अहमदरजा कुरेशी, फिरोज सिध्दीकी, सपोनि किरण मांढरे यांना जखमी झाले. आरोपींनी शिवागाळी व जीवे ठार मारण्याची धमकी देवून अहमदरजा कुरेशी याचे गळ्यातील सोन्याची चैन तसेच सपोनि किरण मांढरे यांचा मोबाईल फोन असा एकूण १,८०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी केला.
उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १३२, १२१(१), १०९, ३०९(६), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(३), २२३ सह भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (अ), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त पोर्ट विभाग, नवी मुंबई श्री. किशोर गायके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उलवे पोलीस ठाणे श्री. अर्जुन रजाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उलवे पोलीस ठाणे श्रीमती अश्विनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खरात, अजित कणसे, पोलीस उपनिरीक्षक रामा ढावरे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार आणि बीट मार्शल १ वरील अंमलदार घटनास्थळी उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक रामा ढावरे यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.



Comments
Post a Comment