आवाज कोकणचा / मुंबई

🌺' भांडुप गावचा ' आपला माणूस ' गोविंद म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹

प्रतिनिधी - जयेंद्र दादा खुणे 




भांडुप गांवातील राष्ट्र सेवा दलाचे माजी संघटक, साने गुरूजी सेवा संघाचे अध्यक्ष *साथी,श्री गोविंद काशीनाथ म्हात्रे* यांचे ९०व्या वर्षी आज दि. १६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ६ च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. भांडूप गावात सोमकांत दळवी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरूकेली. ते त्याकाळी सेवा दलाचे संघटक होते. संयुक्त महाराष्ट्र राज्य चळवळीत त्यांनी हिरारीने भाग घेतला. त्यावेळी त्यांना तुरुंगवास ही झाला होता. तसेच आणीबाणीच्या काळातही आणीबाणी विरोधात कार्य केले. त्यावेळी आणीबाणीच्या काळात केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस व केंद्रीय रेल्वे मंत्री मधू दंडवते हे भांडुपगावात काही काळ भूमिगत होते. त्यांना सहकार्य केले. पुढे गोविंद म्हात्रे यानांही तुरुंगवास झाला. जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर ते पक्षात सक्रिय होते. GKW या कंपनीत काम करताना कामगार संघटनेत ते सक्रिय होते. याशिवाय भांडुपगावच्या सार्वजनिक पुजा समितीचे सन्माननीय सल्लागार सदस्य होते. श्री गणपती मारुती मंदिर, भांडुपगाव या मंदिराचे कार्यकारी सदस्य होते. रेल्वे प्रवासी संघाचे कार्यकारी सदस्य, जेष्ठ नागरिक संघाचे मुख्य सल्लागार ही ते होते. 



साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता म्हणून त्यांनी साने गुरुजी सेवा संघाची स्थापना करून बालवाडी सुरू केली होती. तसेच भांडुपगावात पहिले साने गुरुजी वाचनालय सुरु केले. ते अतिशय क्रियाशील होते, त्यांनी सुरू केलेल्या ट्रॅव्हल्स संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारत भर प्रवास केला. त्यांनी अगदी शेवटीपर्यंत लोकांना पर्यटनासाठी नेत, त्यांना उत्तम सेवा देऊन लोकांत पर्यटनाची गोडी निर्माण केली. भांडुपगावचा चालता बोलता इतिहास म्हणजे ' गोविंद म्हात्रे '. साथी गोविंद काशिनाथ म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐


Comments

Popular Posts