आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता;
बनावट दस्तऐवजांद्वारे व्यायामशाळा संचालन,
ठेकेदाराच्या नावे 1.01 कोटींची थकबाकी उघड..
उरण (पूजा चव्हाण ) :
उरण नगरपरिषदेच्या मंजूर शहर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक 36 अंतर्गत असलेल्या "श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुल" येथील व्यायामशाळेच्या गाळ्याची निविदा बनावट दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त करून घेऊन सदर गाळा जवळपास 11 वर्षे अनधिकृतपणे चालवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी वाशी, सेक्टर 31 येथील प्रतिष्ठित सिव्हील ठेकेदार वासुदेव छगन पाटील (वय 53) यांनी उरण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली असून, संशयित आरोपी सागर विलास मोहिते (वय 41) यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, तक्रारदार वासुदेव पाटील हे मागील दोन दशकांपासून नवी मुंबई महानगरपालिका व सिडकोच्या पे अँड पार्क, सार्वजनिक शौचालय इत्यादी कामांची कंत्राटी पद्धतीने जबाबदारी सांभाळत असून त्यांची 'व्ही. सी. पाटील इंटरप्रायझेस' ही नोंदणीकृत फर्म आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी उरण नगरपरिषदेकडून त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला व 24 मार्च रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी माननीय नगराध्यक्षा महोदया यांनी त्यांना 1,01,63,498 रुपये थकबाकी भरण्यासंदर्भातील नोटीस सुपूर्द केली. श्री. पाटील यांनी उरण नगरपरिषदेच्या अखत्यारीत कोणतेही काम केले नसल्याने त्यांना याबाबत तीव्र आश्चर्य व्यक्त केले. सखोल चौकशीअंती त्यांच्या निदर्शनास आले की, सप्टेंबर 2015 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाचा गैरवापर करून क्रिडा संकुलातील तळमजल्यावरील व्यायामशाळेच्या गाळ्याची निविदा प्राप्त केली होती. यासाठी संशयित आरोपीने श्री. पाटील यांचे पॅन कार्ड क्र. AKVPP4299H, रेशन कार्ड, आयटी रिटर्न्स आदी महत्त्वाच्या दस्तऐवजांचा अनधिकृत वापर केला. तसेच दिनांक 27 मे 2015 व 22 मार्च 2016 रोजी संपन्न झालेल्या करारनाम्यांवर त्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. 'व्ही. सी. पाटील इंटरप्रायझेस' या नावाने बनावट लेटरहेड, बनावट गुमास्ता परवाना, बनावट Masked ID 20159871057 आणि बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून सदर निविदा मिळवण्यात आली व मुदतवाढीसाठी देखील बनावट पत्रव्यवहार करण्यात आला.
संशयित आरोपी सागर विलास मोहिते हे 'होरायझन इस्टेट, बी 1104, कामठा रोड, उरण' येथील रहिवासी असून ते व्यायामशाळा संचालक आहेत. निविदा प्राप्त झाल्यापासून सदर गाळ्यात व्यायामशाळा कार्यान्वित होती, मात्र विहित भाड्याचा भरणा करण्यात आला नाही. परिणामी तक्रारदारांच्या नावे 1.01 कोटींहून अधिक रकमेची थकबाकी शासकीय दप्तरी नोंदवली गेली. श्री. पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:31 वाजता प्रथम खबरी अहवाल क्र. 0116 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून घटनेचा कालावधी 01/09/2015 ते 17/04/2026 असा नमूद आहे. घटनास्थळ उरण नगरपरिषद कार्यालयाच्या सान्निध्यातील आरक्षण क्र. 36 आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक राहुल रामाजी काटवानी यांच्याकडे सोपवण्यात आली असून, ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हनिफ दस्तगीर मुलानी यांनी प्रथम खबरी अहवालावर प्रमाणित केले आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बनावट दस्तऐवज, बनावट स्वाक्षऱ्या व शासनाची आर्थिक फसवणूक या अनुषंगाने सखोल तपास सुरू करण्यात आला असून या प्रकारामुळे उरण नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




Comments
Post a Comment