8 वर्षांच्या अक्षर पाटीलचा “अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया”
17 किमी सागरी अंतर पोहून ऐतिहासिक विक्रम..
( उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून )
केवळ 8 वर्षांच्या कु. अक्षर दिपाली चेतन पाटील या चिमुकल्याने समुद्राच्या लाटांबरोबर झुंज देत जिद्दीच्या जोरावर “अटलसेतू ते गेटवेऑफ इंडिया मुंबई” हे 17 किमी सागरी अंतर केवळ 2तास 29 मिनिट 29 सेकंदात पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. कु. अक्षर दिपाली चेतन पाटीलहा उरणमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकत आहे.त्याने केलेल्या या ऐतिहासिक विक्रमामुळे उरण तालुक्यांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*पहाटे २ वाजता घेतली समुद्रात झेप*
दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1 वाजून 59 मिनिटांनी अक्षरने अटल सेतूजवळून अरबी समुद्रात झेप घेतली. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेच्या निरीक्षक सुनील नारायण मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पोहण्याचा थरार अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कु.अक्षरने पूर्ण केला, पहाटे 4 वाजून 29 मिनिटांनी गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्याच्या पायऱ्या त्यांनी स्पर्श करीत 17 किमीचे अंतर अवघ्या 2 तास 29 मिनिट 29 सेकंदात पूर्ण केले.
*केगांव गावाचा सुपुत्र*
मूळ गाव केगाव रहिवासी असलेला अक्षर पाटील हा पाटील कुटुंबियांचा लाडका आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या वेळी त्याची आजी सुरेखा पाटील, आई मेघा पाटील, आजोबा जगन्नाथ पाटील, मामा अभिषेक पाटील, मामी शुभांगी पाटील यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार, 'सी स्विमिंग टीम' आणि मित्र परिवार उपस्थित होता. सर्वांनीच अक्षरचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
*लहान वयात मोठी कामगिरी*
वयाच्या आठव्या वर्षी अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी 17 किमीसारखे आव्हानात्मक सागरी अंतर पार करणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. भर समुद्रातील प्रवाह, रात्रीची वेळ आणि थंड पाणी या सर्वांवर मात करत अक्षरने हा विक्रम नोंदवला आहे. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेने या मोहिमेला अधिकृत मान्यता दिली असून निरीक्षक सुनील मयेकर यांनी वेळेची नोंद ठेवली.
*उरण तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण*
उरण तालुक्यातून एकापाठोपाठ एक जलतरणपटू तयार होत आहेत. अक्षरच्या या यशामुळे केवळ केगांव गावच नाही तर संपूर्ण उरण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या वयात अशी कामगिरी करणाऱ्या अक्षरचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या वेळी रात्रीचे गस्तीसाठी असणारे पोलिस यांनी देखिक अक्षर पाटील याची विचारणा करून त्याचे अभिनंदन केले
तसेच अक्षर पाटील याचा प्रवास हा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्याचे
पर्यवेक्षक संतोष पाटील व त्याची टीम ( साई पाटील, राज पाटील मयुरेश पाटील, जयेश अशोक पाटील) यांनी मोलाचे मेहनत घेत पाठींबा दिला.
यावेळी केगांव गावाचे माजी सरपंच आशिष ताबोळी,महेश पाटील चाणजे, नागाव, केगांव उपविभाग प्रमुख शिवसेना शिंदे गट हे उपस्थित होते.





Comments
Post a Comment