अजिंठा लेणीतील सुरक्षा रक्षकांना मिळाला थकित पगार; पत्रकार आदित्य वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

 अजिंठा लेणीतील सुरक्षा रक्षकांना मिळाला थकित पगार; पत्रकार आदित्य वाघ यांच्या पाठपुराव्याला यश....


 

प्रतिनिधी : अशोक घरत

              संभाजीनगर (औरंगाबाद) :* ऐतिहासिक अजिंठा लेणी येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा तीन महिन्यांचा थकित पगार अखेर जमा झाला असून, या प्रकरणात पत्रकार आदित्य सतीश वाघ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.पनवेल तालुक्यातील डेरवली गावचे धडाडीचे पत्रकार आदित्य वाघ हे गुळसुंदे गावातील चार मित्रांसह ९ मार्च २०२६ रोजी संभाजीनगर येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. ८ मार्च रोजी त्यांनी अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी भेट दिली.

                    अजिंठा लेणी येथे भेटीदरम्यान, तेथे सुरक्षारक्षक व मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. “सफल हॉस्पिटॅलिटी, अहमदाबाद” या कंत्राटदारामार्फत मागील दोन वर्षांपासून ११ सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून, त्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याची व्यथा त्यांनी पत्रकार वाघ यांच्यासमोर मांडली.

             पत्रकार म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवत आदित्य वाघ यांनी तत्काळ संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधला. दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्यांनी “सफल हॉस्पिटॅलिटी”च्या व्यवस्थापन प्रतिनिधी करिष्मा मॅडम यांच्याशी थेट संवाद साधला. या संवादात त्यांनी सुरक्षारक्षकांना पगार का दिला गेला नाही, याबाबत ठाम व सडेतोड प्रश्न उपस्थित केले.


                             या प्रश्नांनंतर संबंधित व्यवस्थापन प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देत, सर्व कर्मचाऱ्यांचे उपस्थिती नोंदी (अटेंडन्स) तपासून त्यानुसार थकित पगार त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे सुमारे २३ दिवसांत सर्व सुरक्षा रक्षकांच्या खात्यात त्यांच्या कामाच्या दिवसांनुसार पगार जमा करण्यात आला.पगार मिळालेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये भारत लाठे, शेख मजीद, गणेश मोहिते, सईद कादरी, शेख नफीस, सुरेश हाडे, उमेश बावस्कर, कृष्णा वराडे, मनोज दामोदर, सुभाष दामोदर, प्रकाश गायकवाड, अनिता गायकवाड आणि अभिमन्यू भोई यांचा समावेश आहे.

         दीर्घकाळ प्रलंबित असलेला पगार मिळाल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून,त्यांनी पत्रकार आदित्य वाघ यांचे मनापासून आभार मानले. तसेच "पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य" व “आवाज महामुंबईचा” या चॅनेलचेही त्यांनी कौतुक केले.

         या घटनेमुळे पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली असून, योग्य वेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामगारांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Comments

Popular Posts