पनवेलमधील JWR लॉजिस्टिक्स हॅझर्डस केमिकल गोदामाला भीषण आग;
जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची शर्थ...
उरण प्रतिनिधी/पूजा चव्हाण
पनवेल तालुक्यातील पालेखुर्द परिसरात असलेल्या जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक्स प्रा. लि. या हॅझर्डस कार्गो कंपनीच्या केमिकल गोदामाला शनिवारी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक्स परिसरात अनेक लॉजिस्टिक्स व वेअरहाऊस कंपन्या आहेत. आगीचे लोळ व स्फोटाचे आवाज ऐकून परिसरातील कामगार व नागरिकांमध्ये घबराट पसरली. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे.
JWR लॉजिस्टिक्स ही कंपनी जेएनपीए बंदरापासून 11 किमी अंतरावर NH-4B वर 97 एकरात पसरलेली आहे. कंपनीकडे कंटेनर फ्रेट स्टेशन, कस्टम बॉन्डेड वेअरहाऊस आणि हॅझर्डस वेअरहाऊस ची सुविधा आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास कंपनीच्या केमिकल साठवणूक विभागात अचानक आगीचे मोठे लोळ उसळले. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि काळ्या धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. केमिकल रिअॅक्शन, शॉर्ट सर्किट की मानवी चूक याबाबत तपास सुरू आहे. आग लागताच गोदामातील कामगारांनी जीव वाचवण्यासाठी एकच धावाधाव केली. सुदैवाने सर्व कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. केमिकलची आग असल्याने अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नाची शर्थकरून पाण्यासोबत फोमचाही वापर करून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हॅझर्डस केमिकलमुळे आगीचा भडका वारंवार उडत असल्याने अग्निशमन जवानांना मोठे आव्हान पेलावे लागत आहे. जवळपासच्या कंपन्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सदरची जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक्स प्रा. लि. ही भारतातील सर्वात मोठ्या LCL कंटेनर फ्रेट स्टेशनपैकी एक आहे. कंपनी शिपिंग, वेअरहाऊसिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि धोकादायक मालाची वाहतूक- साठवणूक करते. सध्या आग पूर्णपणे विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून कूलिंग ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. सुदैवाने जीवितहानी टळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र केमिकल गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पनवेल महापालिका व MIDC अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. केमिकल गोदामात फायर सेफ्टीची पुरेशी यंत्रणा होती का, परवाने अद्ययावत होते का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून आहे.





Comments
Post a Comment