आवाज कोकणचा / नवी मुंबई
भोर तालुक्यात ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; ६५ वर्षीय नराधमाला अटक, राजकीय नेत्यांकडून तीव्र संताप...
पूजा चव्हाण - उरण
भोर/पुणे, ता. २ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात १ मे २०२६ रोजी घडलेल्या अमानवी घटने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुट्ट्यांमध्ये आजीकडे आलेली अवघी ४ वर्षांची चिमुरडी दुपारी ३ वाजता घरासमोर खेळत असताना गावातीलच ६५ वर्षीय मजूर असलेल्या नराधमाने तिला खाण्याचे आमिष दाखवून फूस लावून जवळच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. दुपारी ३:४५ पासून मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. परिसरातील CCTV फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसल्याने सायंकाळी ५:३० वाजता बनेश्वर फाट्याजवळ ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संध्याकाळी ६ वाजता गोठ्यातून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
या क्रूर घटनेनंतर नसरापूर गावात संतापाचा उद्रेक झाला असून २ मे रोजी गावाने कडकडीत बंद पाळला. शेकडो महिला व ग्रामस्थांनी पोलीस चौकीला घेराव घातला आणि मुंबई-बंगळुरू हायवेवर रास्ता रोको केला. नवाले ब्रिजवर मृतदेह ठेवून 'आरोपीला फाशीच द्या' अशी मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून एसपी संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकर चार्जशीट दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात अशा नराधमांना थारा नाही, कायद्याचा बडगा उगारला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेला "मानवतेला कलंक" संबोधले. त्यांनी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून दोषीवर कठोर कारवाईचे आश्वासन घेतले आणि स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत यांनी मात्र सरकारवर टीका करत "पुण्यात नाबालिगवर रेप करून हत्या होते, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा-सुव्यवस्था सोडून इतर राज्यांच्या निवडणुकांत व्यस्त आहेत" असे म्हटले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ही घटना अत्यंत शर्मनाक असल्याचे सांगून आरोपीला फाशीची शिक्षा आणि फास्ट-ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. सध्या नसरापूर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी सुरू असून वैद्यकीय व फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. संपूर्ण राज्यातून आरोपीला फाशीची मागणी जोर धरत आहे.




Comments
Post a Comment