आवाज कोकणचा / नवी मुंबई 

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या तृतीय पदवीदान समारंभाचे भव्य आयोजन..


राजस्थानचे महामहीम  राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते पदवी प्रदान...


नवी मुंबई, 29 मे 2026

अशोक म्हात्रे / पनवेल

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU), नवी मुंबईचा तृतीय पदवीदान समारंभ शुक्रवारी विद्यापीठ परिसरातील जी. डी. बडाया ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता . अत्यंत उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झालेल्या या समारंभात 2023 आणि 2024 साली यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदव्युत्तर व पीएचडी शाखेतील 1268 विद्यार्थ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे राजस्थानचे राज्यपाल मा. श्री हरिभाऊ किसनराव बागडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या.


समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज्यपाल श्री बागडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनातून शौर्य, राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.



 पदवी प्राप्त करणे ही जीवनातील महत्त्वाची उपलब्धी असली तरी बौद्धिक आणि सामाजिक स्तरावरही स्वतःचा विकास करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीची ओळख नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सचोटी यांमध्ये असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या मूल्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि संस्कारांचा उपयोग समाज व राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.



समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वंदे मातरम राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने झाली.  विद्यापीठाचे कुलपती डॉ. केशव बडाया यांनी पदव्या व प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या घोषणेद्वारे केली. यावेळी एकूण 1268 पदव्या व प्रमाणपत्रांना मान्यता देण्यात आली. यामध्ये 34 पीएच.डी., 535 पदव्युत्तर पदव्या तसेच विविध पदवी आणि इतर अभ्यासक्रमांच्या पदव्यांचा समावेश होता. डॉ. बडाया यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रख्यात शास्त्रज्ञ आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक प्रा. (डॉ.) शेखर सी. मांडे यांनी विशेष अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नवोपक्रम, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करत भारताच्या नेतृत्वाखाली जगाला नवी दिशा देण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे आणि देशाचा गौरव वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.



वरिष्ठ आयएएस अधिकारी श्री अजिताभ शर्मा यांनीही विशेष अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित केले. समर्पण, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वगुणांच्या बळावर समाज व राष्ट्राच्या विकासात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. एल. वर्मा यांनी विद्यापीठाच्या वार्षिक प्रगती अहवालाचे सादरीकरण केले. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, कौशल्य विकास आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याच्या क्षेत्रात विद्यापीठ सातत्याने प्रगती करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

या समारंभाला विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



Comments

Popular Posts