आवाज कोकणचा / नवी मुंबई
दिव्यांगांच्या आरक्षित डब्यात सर्वसामान्यांना मज्जाव करा; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा..
पत्रकार उत्कर्ष समितीचे रेल्वे प्रशासनाला निवेदन..
मुंबई, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कसारा, खोपोली तसेच हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांमधील दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये सर्वसामान्य सक्षम प्रवाशांकडून होणारा अनधिकृत प्रवास थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी पत्रकार उत्कर्ष समितीने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, रायगड सदस्य सुनील भोईर, मुंबई अध्यक्ष आनंद मुसळे, सदस्य उमेश गीरोला व राजू गुज्जा उपस्थित होते.
समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्षम प्रवासी प्रवास करीत असल्याने दिव्यांग नागरिकांना चढ-उतार करताना तसेच प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कार्यालयीन गर्दीच्या वेळेत या डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने वादविवाद, धक्काबुक्की आणि असुरक्षित वातावरण निर्माण होते.
यामुळे दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांच्या हक्काच्या सुविधांवर गदा येत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. रेल्वे प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर आर्थिक दंडासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिव्यांग प्रवाशांना त्यांचा हक्काचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सन्मानाने करता यावा यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे पत्रकार उत्कर्ष समितीने स्पष्ट केले आहे.




Comments
Post a Comment