आवाज कोकणचा / नवी मुंबई 

टीएनएआय नवी मुंबई मिलेनियम सिटी शाखेची निवडणूक २०२६


बारा वर्षांनंतर ऐतिहासिक, विक्रमी व लोकशाही पद्धतीने संपन्न

दिपाली उमाले / नवी मुंबई, दि. २७ जून २०२६ : भारतीय परिचारिका संघटना (The Trained Nurses' Association of India – TNAI) यांच्या नवी मुंबई मिलेनियम सिटी शाखेची निवडणूक तब्बल बारा वर्षांनंतर, म्हणजेच सन २०१३ नंतर प्रथमच, अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली. ही निवडणूक नवी मुंबईतील परिचारिका क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरली.

नेरुळ येथील तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आयोजित या निवडणुकीत नवी मुंबई परिसरातील शासकीय, निमशासकीय, महापालिका व खासगी रुग्णालयांतील परिचारिका तसेच विविध परिचर्या महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निवडणुकीत तब्बल ५३२ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावून विक्रमी मतदानाची नोंद केली.



संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, शांततापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. निवडणुकीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (Returning Officer) म्हणून पुणे येथील डॉ. ज्योत्स्ना देशपांडे यांनी अत्यंत निष्पक्ष व कुशलतेने संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.

यावेळी टीएनएआय महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ पी. राठोड, उपाध्यक्षा सौ. श्वेता दाभोलकर, डॉ. भारती वीर, डॉ. साईसागर क्षीरसागर, सौ. हांडे तसेच सौ. आशा संसारे हे राज्य कार्यकारिणीचे मान्यवर सदस्य प्रत्यक्ष उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, मार्गदर्शन व देखरेख करीत होते. त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणूक अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

निवडणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा अटारे यांनी उत्कृष्ट सभागृह, आवश्यक सुविधा व सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या सहकार्याबद्दल सर्व स्तरांतून विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

यंदाच्या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव, चेअरपर्सन – इकॉनॉमिक वेल्फेअर कमिटी आणि चेअरपर्सन – प्रोग्राम कमिटी या पदांसाठी चुरशीची लढत झाली. संबंधित उमेदवारांनी विजय संपादन केला. इतर सर्व पदांसाठी एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. तसेच संयुक्त सचिव आणि चेअरपर्सन – नर्सिंग शिक्षण व संशोधन विभाग ही दोन रिक्त पदे निवडणूक समितीने संबंधित उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याच्या आधारे भरली.

नवनिर्वाचित कार्यकारिणी

अध्यक्ष : सौ. स्नेहलता जाधव (माजी मुख्य अधिसेविका, नवी मुंबई महानगरपालिका; माजी अध्यक्ष – २० वर्षे)

उपाध्यक्ष : डॉ. ज्योती चौधरी (नर्सिंग अधीक्षक, एमजीएम मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सानपाडा)

सचिव : डॉ. प्रतिभा अटारे (प्राचार्या, तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग, नेरुळ)

संयुक्त सचिव : डॉ. वैशाली जाधव (डीन, फॅकल्टी ऑफ नर्सिंग व प्राचार्या, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग, नवी मुंबई)

खजिनदार : डॉ. दिपाली नरेंद्र उमाळे (नर्स मॅनेजर, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, वाशी)

SNAI सल्लागार : डॉ. दीपा गणेश रेड्डी (प्राचार्या, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, नेरुळ)

चेअरपर्सन – नर्सिंग शिक्षण व संशोधन विभाग : सौ. शीतल भालेराव (प्राध्यापक, आयटीएम कॉलेज ऑफ नर्सिंग, पनवेल)

चेअरपर्सन – प्रोग्राम कमिटी : डॉ. शैलजा दाते (प्राचार्या, डॉ. जी. डी. पॉल फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, खारघर)

चेअरपर्सन – मेंबरशिप कमिटी : श्री. गणेश गुरव (ATREC, टाटा हॉस्पिटल, खारघर)

चेअरपर्सन – नर्सिंग सर्व्हिस सेक्शन : सौ. ज्योती लहारे (नवी मुंबई महानगरपालिका)

चेअरपर्सन – इकॉनॉमिक वेल्फेअर कमिटी : डॉ. शालिनी अब्राहम (प्राध्यापक, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ नर्सिंग, नेरुळ)

चेअरपर्सन – सार्वजनिक आरोग्य परिचर्या विभाग : सौ. मानसी भिलारे (नवी मुंबई महानगरपालिका)

प्रतिनिधी – ANM/LHV कमिटी : सौ. मंगला पाटील (नवी मुंबई महानगरपालिका)

निकाल जाहीर होताच उपस्थित सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात स्वागत केले. नव्या कार्यकारिणीकडून परिचारिका व्यवसायाचा सर्वांगीण विकास, सातत्यपूर्ण शिक्षण, संशोधन, व्यावसायिक नेतृत्व, सदस्य कल्याण, युवा परिचारिकांचे सक्षमीकरण तसेच परिचारिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी टीएनएआय महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ पी. राठोड यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करताना सांगितले की, "नवी मुंबई मिलेनियम सिटी शाखेने लोकशाही मूल्यांचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. ही निवडणूक परिचारिका संघटनेच्या बळकटीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल."

उपाध्यक्षा सौ. श्वेता दाभोलकर यांनीही नवनिर्वाचित कार्यकारिणीस शुभेच्छा देत महाराष्ट्र राज्य शाखेकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

बारा वर्षांनंतर झालेली ही विक्रमी, शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वी निवडणूक टीएनएआय नवी मुंबई मिलेनियम सिटी शाखेच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरली आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी रुग्णालये, नवी मुंबई महानगरपालिका तसेच सर्व परिचर्या शिक्षण संस्थांतील प्राचार्य, शिक्षक, अधिसेविका, परिचारिका व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नव्या कार्यकारिणीला एकमुखी पाठिंबा दिला. परिचारिका नेतृत्वाच्या नव्या पर्वाची ही भक्कम सुरुवात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Comments

Popular Posts